श्री साईबाबा संस्थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलात श्री साईबाबा कनिष्ठ व श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाले असल्याबाबतची माहीती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गुरुवार दि. ०४ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वा या संकुलात श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांचे हस्ते व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, संजय जोरी, प्राचार्य संतोष औताडे, गंगाधर वरघुडे, आसिफ तांबोळी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तसेच संस्थान कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या माध्यमातून शिर्डी व परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना अल्पदरात शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देणेच्या उद्देशाने संस्थानने नवीन शैक्षणिक संकुलाची निर्मिती करणे कामी निमगांव-को-हाळे हद्दीतील गट नं.१८३ मध्ये १३.५ एकर जागेत या संकुलाचे भूमीपुजन शताब्दी वर्षांत भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते १९ ऑक्टोंबर २०१८ रोजी करणेत आले होते. यासाठी २६७ कोटी रुपये खर्च आलेला असून यामध्ये इंग्लिश मेडीयम स्कुल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच कन्या विद्या मंदिर यांकरीता स्वतंत्र व्यवस्था करणेत आलेली आहे. प्रत्येक इमारतीत डिजीटल क्लासरुम, सुसज्ज प्रयोगशाळा, आर्ट हॉल, ग्रंथालय, भोजन कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. याच बरोबर १०५० आसन क्षमता असलेले ऑडीटोरीयम, जिम, बैडमिंटन हॉल, टेबल टेनिस, कैरम या सारख्या खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. याचप्रमाणे जलतरण तलाव व इतर खेळांसाठीही मैदान तयार करणेत आलेले आहे.
शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी सदर संकुलाचे आर्किटेक्ट डी. ओ. निकम, पुणे यांचे प्रतिनीधी अविनाश बराटे, न्याती कन्स्ट्रक्शनचे ज्ञानेश्वर डोमे, शानदार इंटेरियर प्रा. लि. चे गौरव नागावकर, श्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अविनाश कुदळे व श्री साईबाबा संस्थानचे कनिष्ठ अभियंता श्री गणेश कोराटे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी केले तर प्राचार्य गंगाधर वरघुडे यांनी आभार प्रदर्शन केले व प्रा. डॉ. सोनाली हरदास यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.