Languages

  Download App

News

News

श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका

 

इतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा

                 “श्री साईसच्चरित्राच्या” १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, ‘नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरुंनी सांगितलेली आचारपध्दती लक्षात ठेवून लोक आपल्या उध्दाराचा मार्ग निवडतात. गुरुंच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उध्दार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो.’ श्री साईबाबांना देश-विदेशातील लाखो साईभक्त गुरु मानतात. शिर्डीतही दिनांक २० जुलै २०२४ ते दिनांक २२ जुलै २०२४ याकाळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने श्री साईबाबा आणि श्री गुरुपौर्णिमा यांची महती सांगणारा विशेष लेख.

 

नुलकरांचे निमित्त-गुरुपौर्णिमेस प्रारंभ

          श्री साईबाबांचे निस्सिम भक्त तात्यासाहेब नुलकर हे त्यांची आई व सासू यांना घेऊन शिर्डीत आले होते. त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा असल्याने तात्यासाहेब नुलकरांनी पौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा केली. पूजा करुन  तात्यासाहेब नुलकर निघून गेल्यानंतर बाबांनी तात्या पाटील कोते यांना बोलावणे पाठविले. बाबांचे बोलावणे आले त्यावेळी तात्या पाटील कोते हे आपल्या शेतावर काम करत होते. बाबांचे बोलावणे आल्यानंतर लगेचच ते बाबांकडे आले. त्यावेळी बाबा तात्या पाटील कोतेंना म्हणाले ‘तो काय एकटा माझी पूजा करतोतुला करायला काय झाले?’ भक्तांच्या मनात इच्छा असूनही बाबा रागावतील म्हणून त्यांची गुरु म्हणून पूजा करण्याचे धाडस कोणी दाखवत नसे. परंतु आता बाबांनीच अप्रत्यक्ष संमती दिल्याने तात्या पाटील कोते व तेथे उपस्थित असलेले माधवराव देशपांडे वगैरे भक्तांना खूप आनंद झाला. तदनंतर दादा केळकर जेष्ठ असल्याने त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी व्दारकामाईत जावून गंधअक्षदाहारफुलेधोतरजोडी घेवून जावून बाबांची यथाविधी पूजा केली. तेंव्हापासून साईभक्त  गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करु लागले.

गुरु ज्ञानसागारु

            श्री साईचरित्राच्या १७ व्या अध्यायात हेमाडपंतांनी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावेविश्वासपूर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरुंनी सांगितलेली आचारपध्दती लक्षात ठेवून लोक आपल्या उदधाराचा मार्ग निवडतात. त्यांच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उद्धार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. भक्ती व श्रध्दायुक्त मनानेपुर्ण नम्रतेने साष्टांग नमस्कार करुन गुरुला शरण गेल्याशिवाय तो शिष्याला ज्ञानाचा ठेवा देत नसतो. गुरुला सर्वस्व अर्पण करुन त्याची सेवा करावीबंध व मोक्ष या गोष्टी स्पष्ट करुन घ्याव्यातविद्या व अविद्या याबद्दल त्यांना प्रश्न करावेम्हणजे गुरु महाराजांकडून उत्तम फळ मिळते. आत्मा कोणपरमात्मा कोण हे गुरु शिवाय कोणालाही सांगता येणार नाही. गुरु देखील शिष्य पुर्णपणे शरण आल्याशिवाय ज्ञानाचा एक कणही देत नसतो. गुरुशिवाय इतर कोणी ज्ञान दिलेतर ते संसारातून पुर्ण सुटका करणारे नसतेमोक्षाचे चिंता चितही फळ देणारे नसते आणि कधीही मनात ठसणारे नसते. म्हणूनच गुरुविना ज्ञान नाहीहे सर्वजण जाणतात. ब्रम्ह व आत्मा यांच्या ऐक्याची सोय करायला गुरुचेच पाय समर्थ आहेत. तेथे आढेवेढे न घेताताठ अभिमान टाकूनजमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान वाकवा आणि मनाचा निश्चय पक्का करुनगुरुचे पाया धरुन तोंडाने म्हणा, “मी तुमचा दासानुदास आहे आणि मला तुमच्याच पायांचा भरवसा आहे.” मग पहा त्या  गुरुचा चमत्कार!  तो गुरुरुपी दयेचा सागर डोलायला लागेल आणि आपल्या लाटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्यावर झेलील. आपला अभय हस्त तुमच्या डोक्यावर ठेवून इडापिडांना उध्वस्त करील आणि मस्तकाला उदी फासून पापाच्या सर्व राशी जाळून टाकील.

 साईनाथ गुरु माझे आई

            हेमाडपंतांनी साईचरित्राच्या १८ व्या अध्यायात म्हटले आहे कीसाईबाबा अगदी थोडासुध्दा राग – लोभ न करता ज्याचा जसा अधिकार असेल तसाच त्याला ख-याखु-या मार्गाचा उपदेश करतात. कित्येकांचे असे मत आहे कीगुरुने सांगितलेले दुस-या कोणाला सांगितलेतर ते विफल होतेपरंतु हे केवळ काल्पनिक व अर्थाशिवायचे उगाचच ढोंग आहे. प्रत्यक्षच कायस्वप्नात सांगितलेला देखील चांगला उपदेश सगळयांना सांगितला पाहीजे. याला काही आधार किंवा पुरावा नाही असे म्हणाल तर बुधकौशिक ऋषींचा आधार आहे. त्यांनी स्वप्नात दीक्षा रुपात प्राप्त झालेले रामरक्षा स्तोत्र’ सर्वांना कथन केले आहे. सदगुरु हे वर्षा ऋतुतील ढग आहेत. मोठया कौतुकाने ते स्वानंदरुपी पाण्याचा वर्षाव करतात. ते काय कोंबून ठेवण्यासाठी! स्वतः मनसोक्त पिऊन सर्वांना पाजावे. लेकराची हनुवटी धरुन त्याच्या आरोग्यासाठी माता जशी त्याला मायाळूपणे औषधाची गोळी पाजते तसेच बाबांचे हस्त कौशल्य होते. उपदेश करण्याचा त्यांचा मार्ग गुप्त नव्हता. आपल्या भक्तांचा हेतू कोणत्याही रितीने ते पुरवित असत.

            सदगरुचा सहवास धन्य होय. त्याचे महत्व कोण वर्णन करुन शकेल सदगुरुचे एकेक बोल आठवले कीआपली ते वर्णन करण्याची स्फुर्ती उचंबळून येते. ईश्वराची भक्तीभावने स्तुतीपूजा केली असता आणि गुरुची सेवा व पूजा केली असता गुरु कडून ज्ञान प्राप्त होतेइतर साधने फुकट जातात. विक्षेप व आवरण यांच्यामुळे संसाराचा मार्ग अंधूक झालेला असतो. गुरुच्या उपदेशरुपी दिव्याचे किरण अडथळया शिवाया मार्ग दाखवितात. गुरु प्रत्यक्ष ईश्वर आहेब्रह्माविष्णू व महेश्वर आहे. गुरुच वास्तविक परमेश्वर व परात्पर ब्रह्म आहे. म्हणूच गुरुगीतेत, “गुरुब्रह्मह गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः।  गुरुःसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः।।” असे म्हटलेले आहे. गुरु माता आहे व पिताही आहे. देव रागावलातर गुरु वाचवितोपरंतु गुरु रागवलातर कोणीही वाचवू शकत नाही. हे सदासर्वदा जाणावे. गुरु प्रवृत्तीचा (प्रापंचिक व्यवहाराचा) मार्ग दाखविणारापुण्यक्षेत्रे व व्रते यांची माहिती सांगणारातसेच निवृत्तीधर्मअधर्मविरक्ती यांच्याबददल तसेच वेद व श्रुती बददल व्याख्यान करणारा आहे.

बाबांचं गुरुस्थान ....गुरुस्थानी बाबा

            श्री साईबाबा शिरडीस प्रथम दृष्टीस पडले ते निंबवृक्षातळी. त्याठिकाणी ते ध्यान लावून आसनस्थ बसत असत. हे स्थान आपल्या गुरुचे असून ते आपल्याला अत्यंत प्रिय आहे. असे बाबा म्हणत असत. गुरुवारी व शुक्रवारी सुर्यास्ताच्या वेळी येथील जागा सारवूनक्षणभर का होईनाजो येथे उद जाळील त्याला सुख प्राप्ती होईलअशी महती या स्थानाची बाबांनी सांगितली आहे. येता-जाता ते त्या ठिकाणी नतमस्तक होत असत. श्रीसाईंनी गुरुमहात्म्य अपरंपार वर्णन केलेत्यांनी स्वतः गुरु म्हणून कोणाला उपदेश केला नाही. तरी देखील त्यांच्या मुखातून निघालेले या सहज उद्गाराने हळु-हळु अनेकांच्या मनातील प्रश्नांची उकल होत असे.

            गुरुंची कपाळाला गंध लावून जशी पुजा केली जाते तशी आपली पुजा बाबा सुरुवातीच्या काळात कोणाला करु देत नसत. केवळ म्हाळसापतीच फक्त बाबांच्या कपाळाला गंध लावून त्यांची पुजा करत असत. इतर भक्त बाबांच्या पायांना गंध लावून पुजा करीत असत. बाबांच्या कपाळाला प्रथम गंध लावले ते नानासाहेब चांदोरकर यांच्या बापू नावाच्या मुलाने त्यानंतर एकदा तात्यासाहेब नुलकरांचे स्नेही डॉक्टर पंडीत बाबांच्या दर्शनाला आले. त्यांनी बाबांची मस्तक भरुन त्यावर गंधाच्या सुरेख त्रिपुंड्र रेखाटला. हे अघटीत पाहून त्यांच्या समवेत असलेले दादा भट विस्मयांकीत झाले आणि आता बाबा कोपतीलअसे त्यांना वाटले. पण तसे काही घडले नाही. त्याच दिवशी सायंकाळी या अघटीताबददल जाणून घेण्या विषयीची उत्सुकता दादांनी बाबांसमोर प्रगट केली. त्यावेळी त्या डॉक्टराने आपला गुरु मानून माझी पूजा केली असे बाबांनी सांगितले.

सच्चरितातलं गुरुमहात्म्य

            हेमाडपंतांनी साईचरित्राचा १८ व्या अध्यायाच्या शेवटी व १९ व्या अध्यायाचे सुरुवातीस गुरुचे महत्व विशद करतांना राधाबाई नावाच्या एका वृध्द महिलेची बाबांवर असलेली श्रध्दा व दृढ निश्चय याबाबतची आणखी एक गोष्ट वर्णन केलेली आहे. संगमनेरच्या खाशाबा देशमुखांची आई राधाबाई या साईबाबांची कीर्ती ऐकून एकदा शिरडीला दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी साईबाबांच्या चरणी निष्ठा ठेवून दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या चरणी त्यांचे प्रेम जडले आणि त्यांच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली की साईसमर्थांना गुरु करावे. बाबांना गुरु केल्यानंतर ते योग्य उपदेश करतील आणि आपला परमार्थ साधला जाईल अशी राधाबाईंची इच्छा होती. राधाबाई वयाने म्हाता-या होत्या. परंतु त्यांची बाबांवर अत्यंत निष्ठा होती. त्यामुळे बाबांकडून काहीतरी उपदेश घ्यावा असा त्यांनी मनात निश्चय केला. जोपर्यंत बाबा माझ्यावर कृपा करुन एखादा स्वतंत्र कानमंत्र मला देत नाहीत तोपर्यंत मी शिरडी सोडून कुठेही जाणार नाही असे म्हणत तीन दिवस अन्नाचा एक कण व पाण्याचा एक थेंबही त्यांनी घेतला नाही. श्री साईबाबांच्याच तोंडचा मंत्र घ्यायचाइतर ठिकाणाचा घेतला तर तो पवित्र नव्हे. श्री साईबाबा पुण्यकारक महान संत आहेत. तेच माझ्यावर अनुग्रह करोत असा अंतःकरणात दृढ निश्चय करुन राधाबाईंनी खाणेपीणे वर्ज्य केले आणि धरणे धरुन बसल्या.

राधाबाईंचा दृढ निश्चय पाहून बाबांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. त्यांच्या मनाचा कल फिरविला. बाबांनी त्यांना प्रेमाने हाक मारुन म्हटलेआई!“ तु कां गे धरणे घेतलेस? मरण का तुला आवठले? जीवाचे हाल का करतेस? मी केवळ तुकडे मागणारा फकीर आहे. माझ्याकडे प्रेमाने पहा. खरेच मी लेक आहे आणि तु आई आहेस. आता माझ्याकडे लक्ष दे. तुला एक नवलाची गोष्ट सांगतोजी तुला खुप सुख देईल”  पहा माझा गुरु मोठा अवलीया व कृपेचा सागर होता. त्याची सेवा करुन करुन मी थकलो. परंतु तो मला कानमंत्र देत नव्हता. माझ्या मनातही प्रबळ इच्छा होती की त्याची कास सोडू नये आणि खूप प्रयत्न करुन त्यांच्या मुखाने मंत्र घ्यावा. सुरुवातीला त्याने मला लुबाडले. माझ्याकडून दोन पैसे मागितले. मी ते लगेच देवून टाकले आणि मंत्राच्या शब्दांसाठी खूप विनंती केली. माझा गुरु पूर्णकाम (ज्याच्या सर्व इच्छा आकांक्षा तृप्त झालेल्या आहेत असा ) होता. त्यांला दोन पैशांचे काय काम? शिष्याकडून पैसे मागतो त्याला निष्काम कसे काय म्हणावे? परंतु अशी शंका मनात येऊ देऊ नका. त्याला व्यावहारीक पैशाची इच्छा स्वप्नातही नव्हती. पैशाशी त्याला काय कर्तव्य! निष्ठा व सबूरी हेच ते दोन पैसे होते. दुसरे नव्हते. मी ते लगेच देऊन टाकले आणि त्यामुळे गुरुमाऊली माझ्यावर प्रसन्न झाली. धैर्य म्हणजेच सबूरी, तीला कधीही दूर सारु नकोस. प्रसंग केंव्हाही व कसाही जड पडलातरी हीच भवपार नेईल. पुरुषांचे पौरुषत्व म्हणजेच सबूरी. ती संताप व दीनता घालवितेयुक्ती – प्रयुक्तीने संकटे निवारते आणि सर्व भिती बाजूला सारते. सबूरीच्या वाटेला यश येते आणि विपत्ती बारा दिशांना पळून जाते. येथे अविचाररुपी त्रासदायक गोष्ट कोणाला ठावून नसते. सबुरी ही सदगुणांची खाण व सद्विचार रुपी राजाची राणी आहे. निष्ठा व सबूरी ह्या सख्या बहीणी असून एकमेकींना जीव की प्राण असतात. सबूरी शिवाय मनुष्यप्राण्याची स्थिती दिनवाणी होते. पंडीत असो वा मोठा गुणवान असोहीच्या शिवाय त्याचे जीवन व्यर्थ असते.

            गुरु जरी स्वतः समर्थ असला तरी शिष्याकडून त्याला तीव्र बुध्दीचीसबळ श्रध्देची व धैर्ययुक्त सबूरीची अपेक्षा असते. दगड व हिरा हे दोन्ही ही सहाणेवर घासलेतर स्वच्छ होतातपरंतु दगड दगड रहातो आणि हिरा मात्र तेजाळ होतो. चमकण्यासाठी दोघांनीही एकच विधी केलापरंतु दगडाला हि-याचे पाणी चढेल काय! हि-याची तेजाळ हिरकणी बनेल आणि दगड आपल्या गुणासारखा गुळगुळीतच राहील.

गुरुगृही साईनाथ

            बाबा म्हणाले, “बारा वर्ष गुरुच्या पायाशी राहीलो आणि गुरुने मला लहानाचा मोठा केले. गुरुच्या पोटात अत्यंत प्रेम होते आणि मला अन्न-वस्त्र’चा तोटा नव्हता. माझा गुरु भक्तीप्रेमाचा केवळ पुतळा होता. त्याला शिष्याचा खरा जिव्हाळा होता. माझ्या गुरु सारखा गुरु विरळाच आणि त्याच्या सहवासाच्या सुखाचे वर्णनच करता येत नाही. त्या प्रेमाचे काय वर्णन करावे! त्याचे मुख पाहता माझे डोळे ध्यानस्थ होत असत. आम्ही दोघेही अति आनंदी असायचो आणि मला दुसरे काही पाहणेच नसायचे. मी रात्रंदिवस प्रेमाने गुरुमुखाचे अवलोकन करीत असे. मला ना भूक ना तहान.. गुरु शिवाय माझे मन अस्वस्थ होत असे. त्याच्या शिवाय दुसरे ध्यान मला नव्हते. त्याच्या शिवाय दुसरे माझे दुसरे लक्ष नव्हते. गुरु हेच एक माझे अनुसंधान होते. खरेच गुरुचे कौशल्य अजब असते.

            माझ्या गुरुचीही हीच अपेक्षा होती. याशिवाय त्याची दुसरी काही इच्छा नव्हती. त्याने माझी कधी उपेक्षा केली नाही आणि माझे संकटापासून सदा रक्षण केले. कधी मी गुरुच्या पायापाशी होतोतर कधी समुद्राच्या पैलतीरी होतो. परंतु त्याच्या सहवाससुखाला अंतरलो नव्हतो. तो मला कृपायुक्त दृष्टीने सांभाळत होता. कासवी जशी आपल्या पिल्लांना स्वतःच्या दृष्टीचे खाऊ घालते तशीच माझ्या गुरुची त-हा होती. दृष्टीनेच तो लेकरांना (शिष्यांना) सांभाळत असे. आई! या मशिदीत बसून मी जे सांगतो ते खरे मान. गुरुचे माझेच कान नाही फुंकले तर तुझे मी कसे फुंकू? कासवीच्या प्रेम दृष्टीनेच तिच्या पोरांना सुख-संतोष लाभतो. आई! उगाच कशाला दुःखी होतेस? मला उपदेश, गोष्टी ठाऊक नाहीत. कासवी  नदीच्या एका किनारी व तिची पोरे पलीकडच्या वाळवंटावर असतांना दृष्टादृष्टीनेच त्यांचे पालन-पोषण होते. म्हणून म्हणतो मंत्राच्या व्यर्थ खटपटी कशासाठी पाहिजेत. तर आता तू जा व अन्न खाजीव धोक्यात घालू नकोस. माझ्याकडे फक्त लक्ष देम्हणजे परमार्थ हातास येईल. “तू माझ्याकडे अनन्यपणे पहा आणि मीही तुजकडे पाहीन”याशिवाय दुसरे काही माझ्या गुरुने मला शिकविलेच नाही. साधनसंपन्नतेची (ज्ञानप्राप्तीची चार साधने म्हणजे विवेकवैराग्यशमादि षड्संपती व मुमूक्षता मिळविण्याची) गरज नाही. सहा शास्त्रांच्या निपूणतेची जरुरी नाही फक्त एक पुरता विश्वास असावा कीगुरुची स्थिती जाणतो तो त्रैलोक्यात धन्य होय. अशा प्रकारे राधाबाईंना बाबांनी बोध केल्यावर ती गोष्ट त्यांच्या मनात ठसली आणि त्यांनी बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवून आपले व्रत थांबविले. 

 श्री साईबाबांची शिकवण

            परमेश्वर आहेत्याच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. तो सर्व चराचरामध्ये भरुन उरला आहे. त्याची लीला अगाध आहे. उत्पन्नही तोच करितोराखितोही तोचवाढवितोही तोच आणि मारितोही तोचतो ठेवीला तसे रहावेत्याच्या  मर्जीत आपण राजी रहावेतळमळ करु नये. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हालत नाही. प्रत्येकाने नेकीने (प्रामाणिकपणेसचोटीने) वागावे. वादावादी करु नये. सदविवेक शक्ती जागृत ठेवावी. आपले कर्तव्य परमेश्वराला द्यावे आणि फलही त्यासच समर्पण करावेम्हणजे आपण अलिप्त राहून कर्म आपल्याला बाधक होणार नाही.

            सर्व भूतमात्रांशी प्रेमाने वागावेवादावादी करु नये. कोणी काही बोलले तर ऐकून घ्यावे. कोणाच्या बोलण्याने आपल्या अंगाला भोके पडत नाहीत कोणाची बरोबरी करु नये. कोणाची निंदा करु नये. कोणी काही केले तरी तिकडे लक्ष देऊ नये. त्याचे त्यांच्यासंगेआपले आपल्यासंगेकष्ट करीत असावे. रिकामे राहु नये. देवाचे नाव घ्यावे. पोथीपुराण वाचावे. आहार-विहार त्यागू नयेतपण नियमित असावे.

            एखाद्याचे वागणे निंदनीय वा ठपका ठेवण्यासारखे असेलतर त्याची कीव जाणून त्याला आपल्यासमोरच शिकवणीच्या दोन गोष्टी सांगाव्यात. त्याच्यामागे त्यांच्या वागण्याबद्दल टिकाउपहास किंवा चर्चा कधीही करु नये आणि असल्या चर्चेत भागही घेऊ नये. याबद्दल एका निंदकाला जमलेल्या इतर भक्तांदेखत विष्ठामिष्टान्नावर यथेष्ट मिटक्या मारणा-या डुकरीकडे बोट दाखवून निर्भर्त्सना केली व त्यालाच कायसर्व भक्तांनाच श्री साईबाबांनी बोध दिला.

श्री साईबाबांच्या मुखातील वचनावली

            मी जरी गतप्राण झालो तरीही माझे वाक्य प्रमाणच माना. माझी हाडे देखील माझ्या तुर्बतीमधून तुम्हाला आश्वासन देतील. मी कायपण माझी तुर्बतसुध्दा तुमच्याबरोबर बोलत राहील आणि तिला जो अनन्यपणे शरण जाईल त्याच्याबरोबर डोलतसुध्दा राहील. मी डोळ्याआड होईन याची चिंता करु नकामाझी हाडे बोलताना व तुमच्याशी कानगोष्टी करताना तुम्ही ऐकाल. मात्र माझे स्मरण कराअंतःकरणात माझ्याबद्दल विश्वास ठेवा आणि निरीच्छपणे माझे भजन कराम्हणजे आपले कल्याण साधलेले असेल.

            तुम्ही कुठेही असाकाहीही करापरंतु एवढे मात्र सदा लक्षात ठेवा कीतुमच्या कृतीच्या सविस्तर जश घडल्या तशा खबरा मला सतत कळत असतात. असा जो माझ्याबद्दलचा अनुभव तुम्हाला येतो तो मी सर्वांच्या अगदी जवळचासर्वांचा हृदयात वास करणारासगळीकडे जाऊ शकणारा असून सर्वांचा स्वामी आहे. सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला आत व बाहेर व्यापून मी बाकी उरलो आहे. ही सगळी ईश्वराने पूर्वी करुन ठेवलेली योजना आहे आणि त्याचा मुख्य चालक मीच आहे.

            मी सगळ्या चराचर सृष्टीचा उत्पन्न कर्ता आहे व तिन्ही (सत्वरज व तम) गुणांची सारख्या प्रमाणाची अवस्थाही मीच आहे. मीच सर्व इंद्रियांना चाळविणारा आहे आणि कर्ताधर्ता व संहर्ताही मीच आहे. माझ्याकडे जो लक्ष लावतो त्याला कोणतेही संकट नसतेपरंतु ज्याला माझा विसर पडतो त्याला माया चाबकाचे फटकारे मारते म्हणजे छळते. जे जे काही दिसते ते ते माझेच स्वरुप आहे. लहान किडामुंगीरंक (दरिद्री) किंवा भूप (राजा) असोहे मापता न येणारे स्वावर व जंगम विश्व साईंचेच आपले रुप आहे.

            या वर्षीचा श्री गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

 

Recent News