शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंगळवार दिनांक १६ एप्रिल पासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता आज ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.
आज उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी ०६.५० वाजता संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी ७.०० वा गुरुस्थान मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. सकाळी १०.०० वाजता सुरु झालेल्या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर किर्तनकार ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला, यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत डॉ. प्रसाद श्रीराम चौधरी, जालना यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ०६.३० वाजता धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत अलोक मिश्रा, साई आस ट्रस्ट, दिल्ली यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांनी उत्स्फुर्त दाद दिली. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी श्री.सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, प्रज्ञा महांडुळे/सिनारे, डॉ. शैलेश ओक, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.