Languages

  Download App

News

News

शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या वतीने  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्सव संस्थानचे नवीन शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी रेशीम संचालनालय, नागपूरचे उपसंचालक महेंद्र ढवळे, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्यासह विविध विभाग प्रमुख, कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक संकुलाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, तसेच सीईटी, नीट व जेईई परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर दिला. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी जर्मन व जपानी भाषांचे वर्ग तसेच खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात संरक्षण विभाग, फायर अँड सेफ्टी विभाग, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी परेड, कवायती आणि साहसी खेळांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

Recent News