जयपुर फुट शिबीराची कृतज्ञता पुर्वक यशस्वी सांगता! .
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व रुरल इलेक्ट्रीफिकेशन कार्पोरेशन लिमीटेड तसेच श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि.२६ सप्टेंबर २०२४ ते दि.३० सप्टेंबर २०२४ या दरम्यान श्रीसाईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे आयोजीत करणेत आले होते. या शिबीरात ९६४ दिव्यांगांची नोंदणी शिबीर कालावधीत करणेत आलेली होती. आज दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे अध्यक्षतेखाली व श्री महावीर विकलांग सहाय्यता समिती मुंबई, (जयपुर) चे संस्थापक पद्मभुषण डी. आर. मेहता यांच्या हस्ते दिव्यांगांना १०० तिनचाकी सायकल, १०० व्हिलचेअर, २०० वॉकर, १५० काठी, १५० कुबडया व ३०० जयपुर फुट पाय इत्यादी साहित्याचे वाटप करुन कृतज्ञता पुर्वक सांगता करणेत आली. यावेळी साहित्य मिळालेनंतर दिव्यांगांच्या चेह-यावरील आनंद अतुलनीय होता. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रमुख अतिथी डी.आर मेहता हे शिबीराच्या साहित्य वाटप प्रसंगी शिष्टाचार बाजुला ठेवुन दिव्यांगामध्ये मिसळून गेले व दिव्यांगांचे सायकलीचे पाठीमागुन चाल देवुन सारथ्य केले. या प्रसंगी दिव्यांगाच्या हस्तेच प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करणेत आले.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये डी.आर मेहता यांनी शिर्डी येथे जयपुर फुट शिबीराकरीता मिळालेली संधी ही श्री साईबाबांचा अशिर्वाद समजून काम करत आहोत असे सांगीतले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी शिबीरात अहोरात्र काम करणारे रुग्णालयातील ६० कर्मचारी यांचाही मान्यवरांचे हस्ते गौरव करणेत आला.
या प्रसंगी श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुरचे नारायणजी व्यास, श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक, उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरेश टोलमारे यांचेसह हॉस्पिटल मधील कर्मचारी तसेच मोठया संख्येने महाराष्ट्रा भरातुन आलेले दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ यांनी केले तर मान्यवरांचे आभार जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले.